ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर ( 80) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. इंग्रजी पत्रकारितेत नावलौकिक मिळवल्या कणेकर यांनी मराठी साहित्यात मुशाफिरी केली. खुसखुशीत लिखाण विशेषतः सिनेमा आणि क्रिकेटवर तडाखेबंद फटकेबाजी ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनातले विषय असायचे.
तिरकस लिखाण आणि जोरकसपणे मुद्दे मांडणं हे त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांचे आवडीचे विषय होते. ‘लगाव बत्ती’ या शिरीष कणेकर यांच्या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता.
शिरीष कणेकर यांनी बराच काळ इंग्रजी पत्रकारितेत काम केले. फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्स्प्रेस, सिंडिकेटेड प्रेस न्यूज येथे आपल्या कामाची वेगळी छाप सोडली. निवृत्तीनंतरही त्यांनी आपले लिखाण सुरूच ठेवले. ते एकदम खुसखुशीत आणि विनोदी लिखाण करत. त्यांच्या ‘लगाव बत्ती’ कथासंग्रहाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कारने गौरव झाला होता. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स्, लोकसत्ता, सामनासह अनेक मराठी दैनिकातून लिखाण केले. साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंदमधील त्यांचे स्तंभलेखन गाजले.
शिरीष कणेकर यांनी विपुल स्तंभलेखन केले. लोकसत्तामध्ये यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूरपारंब्या हे सदर लिहिले. महाराष्ट्र टाइम्समध्ये सिनेमागिरी, लगाव बत्ती हे लिहिलेले सदर विशेष लोकप्रिय ठरले. लोकमतमध्ये कणेकरी लिहिले. त्यांना सामना दैनिकातून कणेकरीसह चिमटे आणि गालगुच्चेचे लिखाण केले. पुढारीमध्ये चिमटे आणि गालगुच्चे, साप्ताहिक मनोहरमध्ये आसपास, साप्ताहिक लोकप्रभात कणेकरी, मेतकूट लिहिले. साप्ताहिक प्रभंजनमध्ये चित्ररूप, पाक्षिक चंदेरीत कणेकरी, साप्ताहिक चित्रानंदमध्ये शिरीषासन, सिंडिकेटेड कॉलममध्ये फिल्लमबाजी द डेली (इंग्लिश)मध्ये कल्चर व्हल्चर हे सदर लिहिले.
निवडक प्रकाशित साहित्य
- क्रिकेट-वेध
- गाये चला जा
- यादोंकी बारात
- पुन्हा यादोंकी बारात
- ते साठ दिवस
- डॉलरच्या देशा
- रहस्यवल्ली
हिंदी चित्रपटांविषयीची पुस्तके
- कणेकरी
- नट बोलट बोलपट
- शिरीषासन
- पुन्हा शिरीषासन
- फिल्लमबाजी
- शिणेमा डॉट कॉम
SL/KA/SL
25 July 2023