ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन
मुंबई, दि. ३ : ‘खाष्ट सासू’ तसेच खलनायकी व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे (८५) यांचे आज निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर एक वेगळी छाप सोडली होती. दया डोंगरे यांच्या गाजलेल्या कामांमध्ये ‘चार दिवस सासूचे’ (मालिका), ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी चित्रपटांचा आणि ‘स्वामी’ (मालिका) यांसारख्या इतर मालिकांचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते.
११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना लहानपणापासूनच अभिनय आणि संगीताची आवड होती. त्यांच्या कुटुंबातच कला आणि संस्कृतीचा वारसा होता. त्यांची आई यमुताई मोडक या स्वतः एक अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यामुळे अभिनयाची बीजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच रोवली गेली होती.
दया डोंगरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरदर्शन मालिका गाजवल्या. १९९० नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली, मात्र त्याआधी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या अभिनयातील ताकद, संवादफेक आणि व्यक्तिरेखेतील बारकावे यामुळे त्या प्रत्येक भूमिकेला सजीव करत असत.
SL/ML/SL