ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
पुणे,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमध्ये लिलाया भूमिका साकारणारे बहुआयामी अभिनेते विक्रम गोखले (७७) यांनी आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते अखेर आज त्यांनी आयुष्याच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली.
आज सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर संध्याकाळी ६ च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले
बॅरिस्टर या नाटकाने गोखले यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. महासागर, खरं सांगायचं तर, कल्पवृक्ष कन्येसाठी, नकळत सारे घडले, संकेत मिलनाचा, मी माझ्या मुलांचा, के दिल अभी भरा नही अशा एकाहून एक सरस नाटकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी मराठी नाट्य रसिकांच्या मनावर राज्य केले.
माहेरची साडी, कळत नकळत, वजीर, मुक्ता, नटसम्राट अशा अनेक मराठी चित्रपटांमधुन त्यांनी अभिनय केला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या दमदार अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले. ३५ हून अधिक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गोदावरी हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
गोखले याच्या निधनाचे वृत्त कळताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना गोखले यांना आदरांजली वाहणारे शोकसंदेश प्रसिद्ध केले आहेत.
आपल्या चतुरस्र अभिनयाने मराठी आणि हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
“ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.” – सुधीर मुनगंटीवार – सांस्कृतिक कार्य मंत्री
SL/KA/SL
26 Nov. 2022