वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

वाशीम दि ८– वाशीम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. परिणामी, या गावांचा संपर्क इतर भागांशी तुटला आहे.
या पुरामुळे वनोजा गाव, वनोजा तांडा आणि तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे मेहकर ते रिसोड मार्गावरील पुलावर पाणी साचले असून, हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीला देखील पूर आला असून नदी काठचे शेत पाण्याखाली आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ML/ML/MS