महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात, संविधान बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडा – खा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि २६
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिले आहे. हजारो वर्षांच्या गुलामगिरीचे जोखड झुगारून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे. आरक्षण दिले आहे पण आज याच संविधानावर घाला घातला जात आहे. देशातील मनुवादी विचाराचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मनुवाद्यांचा हा कुटील डाव हाणून पाडा, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त मुंबई काँग्रेसने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक कुर्ला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेंबूरपर्यंत संविधान गौरव यात्रा काढली. यावेळी खा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, संविधान हे फक्त पुस्तक नाही तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग केला, बलिदान दिले आणि त्यातून हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र व श्रेष्ठ असे संविधान दिले. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधाचा हक्क दिला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाची शिकवण दिली आहे. पण भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा पहिल्यापासून संविधानाला विरोध आहे, हे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे केली जात आहे. संविधान या लोकांना मान्य नाही, त्यांना मनुस्मृतीवर देश चालवायचा आहे. पण जनतेने जागृत राहिले पाहिजे. आपल्या न्याय, हक्क व भविष्यासाठी तसेच लोकशाहीसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
यावेळी अनुसूचित जाती विभागचे अध्यक्ष सुभाष भालेराव, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अर्शद आझमी, मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक राजा रहेबर खान, वंदना साबळे, रमेश कांबळे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष कचरू यादव इत्यादी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS