मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकार विरोधातील पापपत्र मुंबईकरांच्या हाती देणार
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे तसेच महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे पापपत्र जनतेच्या हाती दिले जाणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. महायुती सरकारचा भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांचा अभाव, रस्त्यावरील खड्डे, पावसात मुंबईची तुंबई झाली, महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. लाडका कंत्राटदार योजना सुरु असून मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचे काम महायुती सरकार करत आहे. दोन वर्ष झाली मुंबईमहानगर पालिकेच्या निवडणुका भाजपाप्रणित युती सरकारने घेतलेल्या नाहीत. न्याय यात्रा मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघाला भेट देणार आहे.स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कॉर्नर सभाही घेतल्या जाणार आहेत.
मुंबादेवी मंदिरातून या न्याय यात्रेची सुरुवात होईल आणि दिवसाच्या शेवटी मुंबादेवी येथे समारोप होईल. लोकसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आता विधानसभेलाही मुंबईतून जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपा व शिंदेसेनेला सत्तेतून बाहेर करायचे आहे. या न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आणि मुंबईतील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
SW/ML/PGB
9 Aug 2024