पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

 पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी, दि ४
पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा तसेच मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संभाजी बारणे यांच्या संकल्पनेतून आणि राजन लाखे संपादित “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन बुधवारी (दि.३ डिसेंबर) वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. अभय कुलकर्णी, अशोक पगारिया, माजी नगरसेविका मनिषा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, संभाजी बारणे, कांचन जावळे, प्रभाकर ओव्हाळ, सागर बारणे, विशाल बारणे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, सध्या संस्कृतीची साठवणूक सुरू आहे. भौतिक साधनांद्वारे संस्कृतीचे जतन करता येत नाही. त्यासाठी गावागावातील लोककला, साहित्य, काव्य, कलावंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, कामगार ही त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदणारी सामाजिक वीण महत्त्वाची आहे. यालाच आपण संस्कृतीची श्रीमंती म्हणू शकतो. संस्कृती ही संज्ञा खूप व्यापक असून बारणे आणि लाखे यांनी पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहाद्वारे शहराच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचे दर्शन घडविले आहे असे डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले.
भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक साहित्य, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली पाहिजे. शहरांमध्ये प्रतिभावंतांची मांदियाळी तयार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातून अनेक कलाकार घडले आणि त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. बारणे आणि लाखे यांनी सादर केलेला काव्यसंग्रह नव साहित्यिकांना प्रेरणा देणारा आहे असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहासाठी शहरातील कवींकडून त्यांच्या स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५२ कविता प्राप्त झाल्या त्यामधून ९६ कवितांचा समावेश या काव्य संग्रहामध्ये करण्यात आला आहे, असे राजन लाखे यांनी सांगितले‌.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कवयित्री सुरेखा कटारिया, अकीला इनामदार, कमल सोनजे, मंगला पाटसकर, प्रा. सुभाष आहेर, डॉ. निळकंठ मालाडकर, सिताराम नलगे, रमेश पिंजरकर आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच फिरोज मुजावर यांनी नृत्याविष्कारतून गणेश स्तुतीचे सादरीकरण केले. ऋचा राजन यांनी गणेश वंदना गायली. सूत्रसंचालन गणेश लिंगाडे यांनी तर संभाजी बारणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *