आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची मांदियाळी
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखीचे उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. भाविक मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले आहेत. देवस्थानकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३८ वे वर्ष आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिभक्तीचे सूर निघत आहेत.
आळंदी आणि देहू परिसरात आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या राहुट्या दिसून येत आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
SL/KA/SL
10 June 2023