वनोजा गावाला मिळतेय ‘ऑरेंज व्हिलेज’ची ओळख

 वनोजा गावाला मिळतेय ‘ऑरेंज व्हिलेज’ची ओळख

वाशीम, दि. १४ (राम धनगर) : विदर्भातील संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील वनोजा गावाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘ऑरेंज व्हिलेज’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त असलेल्या या गावाने आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून आणि पाणी टंचाईवर मात करत संत्रा शेतीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, पाण्याचे योग्य नियोजन करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत येथील शेतकऱ्यांनी संत्रा शेतीत नवा आदर्श घालून दिला आहे.

समृद्धी महामार्गामुळे आज या गावातील संत्रा देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत असून, देशांतर्गत व्यापारी तसेच परदेशी गुंतवणूकदारांची देखील येथे मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू झाली आहे. वनोजाच्या या बदलत्या रूपामुळे संपूर्ण विदर्भातील शेतकरी प्रेरित होत आहेत.

वनोजा गावात २२१८ हेक्टर क्षेत्र असून, त्यातील १०७४ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. यातील ७२२ हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, शेततळ्यांच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केल्याने येथील संत्रा फळबागा समृद्ध बनल्या आहेत. येथील संत्र्यांचा आकार, रंग आणि चव उत्तम असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी वनोजाकडे आकर्षित होत आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये येथील संत्र्यांना मोठी मागणी आहे.

वनोजा गावाने आपल्या मेहनतीच्या जोरावर संत्रा उत्पादनात नवा आदर्श निर्माण केला आहे. कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन घेता येते, याचा वस्तुपाठच येथील शेतकऱ्यांनी घालून दिला आहे. विदर्भ आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी वनोजा गाव प्रेरणादायी ठरत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *