वन्य प्राण्यांमुळे ओसाड पडलेल्या जमिनी वनविभाग घेणार भाड्याने…

मुंबई दि ११ — राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोन मध्ये जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे शेती न होणाऱ्या शेतजमिनी वार्षिक भाड्याने घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता, त्यावर नाना पटोले, किशोर पाटील यांनी उपप्रश्न विचारले.
जंगलालगतच्या अशा जमिनी वन विकास महामंडळाकडून वार्षिक पन्नास हजार रुपये भाड्याने घेऊन त्यावर हे प्रकल्प राबविण्यात येतील, महसूल आणि वन विभागाने एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याचं वनमंत्री म्हणाले. यामुळे पडीक जमिनी उपजाऊ होतील आणि त्याठिकाणी शेतमजुरांना काम ही मिळू शकेल असं ते म्हणाले.
राज्यातील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वन विभागाच्या जमिनी होणार रेखांकित
राज्यातील वन विभागाच्या जमिनी रेखांकित करण्यासाठी महसूल विभागासह समन्वय साधण्यात येत असून त्याची रीतसर नोंद करण्यात येईल अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली, याबाबतचा प्रश्न नरेंद्र भोंडेकर आणि नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.
केंद्र सरकारने निर्देशित केल्यानुसार विदर्भातील झुडपी जंगलांचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन महिन्यात त्यांची हद्द निश्चिती करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ML/ML/MS