‘वंदे भारत’ मध्ये गुजराती भाषेला मानाचे पान ; मायमराठी चौथ्या क्रमांकावर ; मुंबईकर प्रवासी संतप्त
मुंबई, दि. 14 : एका बाजूला मराठी माणूस एकवटला असतांनाच मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे षडयंत्र रेल्वे कडून होत असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री असतांना राज्यात राज्यभाषा, मग राष्ट्रभाषा हिंदी (जी अधिकृत नाही) आणि मग आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र ठरविले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी ‘वंदे भारत’ या संपूर्ण पंचतारांकित सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये त्रिभाषा सूत्र चक्क धाब्यावर बसविण्यात आले असून गुजराती भाषेला मानाचे पान देतांनाच मायमराठी भाषेला अगदी चौथ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘वंदे भारत’ ही सुपरफास्ट पंचतारांकित एक्स्प्रेस अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे येतांना जी उद्घोषणा करण्यात येते त्यात मराठी भाषेत सर्वप्रथम उद्घोषणा होणे अभिप्रेत आहे. परंतु तसे न होता ती ‘अब थोडेही समयमें यह ट्रेन…… स्टेशन तक पहोंच रही हैं |’ धीस ट्रेन रीच ॲट…. स्टेशन ‘, ‘आ ट्रेन थोडाज समयमां….. स्टेशन पहोंचवानी तैयारीमां छे ‘, ‘ही ट्रेन थोड्याच वेळात…..या स्टेशनवर पोहोचत आहे ‘ अशा प्रकारे ऐकायला मिळते. या प्रकारे त्रिभाषा सूत्राचे उल्लंघन करण्यात येत असून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत मुंबईकर प्रवासी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा होत असलेला आरोप रेल्वे खरा करु पाहते की काय ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याचे समजते.*KK/ML/MS