लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून ९ उमेदवार जाहीर !

 लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून ९ उमेदवार जाहीर !

अकोला दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद, महिला आघाडी राज्य महासचिव अरुंधतीताई सिरसाट, राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह राज्य कार्यकारणी आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये भंडारा-गोंदिया – संजय गजानंद केवट, गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले, बुलढाणा- वसंत राजाराम मगर, अकोला – प्रकाश यशवंत आंबेडकर, अमरावती – कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा – प्रा.राजेंद्र साळुंके व यवतमाळ-वाशीम – खेमसिंग प्रतापराव पवार यांच्या नावाचा समावेश आहे.
आज (27 मार्च ) रोजी दुपारी 4 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा (पीसी क्र. – 9) केली जाईल असे ऍड .आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.तर सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेविषय बोलताना आंबेडकर म्हणाले, परिवर्तनाचे राजकारण जे आहे त्या परिवर्तनाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याची चर्चा तिथे झाली. जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढे आणले जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

आंबेडकर म्हणाले की, जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची अंतिम यादी ही 2 तारखेपर्यंत जाहीर होईल. एक नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत, जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की, जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण ते मान्य करायला तयार नव्हते. वंचित बहुजन आघाडीचा वापर हे घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते की, ज्याला आम्ही पूर्णपणे नाकारले आहे.

आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची नवीन वाटचाल आहे असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्हाला आहे.

पहिल्या टप्प्यातील जे ‘वंचित’चे उमेदवार आहेत त्यांना जरांगे पाटील यांचे समर्थन आहे. ३० तारखेला त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा? आणि त्यात काय भूमिका घ्यायची? यावर त्यांनी लोकांचा निर्णय मागितला आहे. 30 तारखेनंतर काही जागांबाबत आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

SW/ML/SL

27 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *