वंचित’ची पहिली यादी जाहीर
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली आहे.
रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम मतदासंघातून मेघा किरण डोंगरे (बौद्ध), धामणगाव रेल्वे मतदासंघातून नीलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे (बौद्ध), साकोली मतदासंघातून डॉ. अविनाश नन्हे (धीवर), नांदेड दक्षिण मतदासंघातून फारूक अहमद (मुस्लीम), लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले (लिंगायत), औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे (मराठा), शेवगाव मतदासंघातून किसन चव्हाण (पारधी), खानापूर संग्राम माने ( वडार) यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
आमच्या पवित्र विचारधारेशी खंबीर राहून, खरे प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्याचा आणि काही कुटुंबाचे वर्चस्व मोडून आम्ही वंचित बहुजन समूहांना प्रतिनिधित्व दिले असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले.
रावेर मतदारसंघासाठी तृतीयपंथी कार्यकर्त्या शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, पारधी समजातील किसन चव्हाण यांना शेवगावमधून उमेदवारी देण्यात आली.
ॲड. आंबेडकर यांनी वंचितचे सहयोगी पक्ष भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन उमेदवारांची घोषणा केली. सुनील गायकवाड (भारत आदिवासी पार्टी) हे चोपडा मतदार संघातून आणि हरीश उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) हे रामटेकमधून उमेदवार असतील.
दोन बौद्धांव्यतिरिक्त, धीवर, लोहार, वडार, मुस्लीम या वंचित जाती समूहांना प्रतिनिधी देखील पहिल्या यादीत दिले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. तसेच आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, आदिवासी मतदार संघातूनच आदिवासींनी लढले पाहिजे. ही मानसिकता इथल्या राजकारण्यांनी केली होती. ती आम्ही या निवडणुकीत मोडत आहोत. आदिवासी समाजातील उमेदवार हा सर्वसाधारण जागेवर सुद्धा लढू शकतो यासाठी आम्ही सुरुवात केली आहे.
संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीची सूचना येण्याआधीच आम्ही प्रसिद्ध करणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
कोणालाही पाठिंबा देणार नाही
मागच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी पाठिंबा मागितला. आम्ही पाठिंबा दिला. आता या निवडणुकीत कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
SW/ML/PGB
21 Sep 2024