शेतीला त्रासदायक वानर, माकडांचे निर्बीजीकरण करण्याचा वन विभागाचा निर्णय

छायाचित्र प्रातिनिधीक
मुंबई दि २२ — राज्यातील शेतीला त्रासदायक ठरणाऱ्या आणि फळबागा उध्वस्त करणाऱ्या कोकणातील माकड , वानर यांची संख्या मर्यादित करण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची दोन केंद्रे कोकणात सुरू करण्यात येतील असा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी आज यासंदर्भातील एका बैठकीत घेतला आहे.
दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दापोली ग्रामोदय शेतकरी कंपनीच्या वतीने वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन दिले होते त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. युती सरकारच्या काळात या त्रासासंदर्भात स्थानिक आमदारांची समिती स्थापन केली होती त्यावर तयार करण्यात आलेल्या अहवालाबाबत आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक निर्बीजीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
भात शेतीला रान डुकरांच्या त्रासाबद्दल त्यांची शेतकऱ्याच्या शेतात पारध करण्याची परवानगी देण्याच्या सूचनाही वनमंत्री नाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र केवळ शस्त्र परवाना असणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्याची खात्री करून यासाठी परवानगी देण्यात येईल असे ही मंत्री म्हणाले. मात्र फासकी तसेच बाँब आदी अमानवी पद्धतीने अशी पारध करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई देण्याचे दावे त्वरित मार्गी लावण्यात यावेत असे निर्देश देतानाच तालुका स्तर आणि त्याखालील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संवेदनशील पद्धतीने वागावे अशा सूचना ही केल्या , वन्य प्राण्यांना जंगलात खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी विविध फळ झाडे आणि तत्सम गोष्टी करण्याच्या सूचनाही वन विभागाला दिल्याचे मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
या बैठकीला विनायक महाजन, संतोष महाजन, सुशांत बाळ, शिरीष बिवलकर , मिलिंद लिमये आदी उपस्थित होते.