मोक्का लावलेल्या वाल्मीक कराडला सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी
बीड, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने ताबा घेतलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी हे आदेश दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात मकोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणात मंगळवारी सीआयडीने वाल्मिक कराडचा ताबा मागितला होता.
वाल्मिक कराडने हत्येचा कट रचल्याचा दावा सीआयडीने केल्यानंतर मंगळवारी केजच्या न्यायालयाने सीआयडीला वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती.
त्यानुसार बुधवारी सकाळी सीआयडीने वाल्मिक कराडचा ताबा घेऊन त्याला बीडच्या विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर केले. सीआयडीने न्यायालयात वाल्मिक कराडच्या १० दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
आरोपींसोबतचे वाल्मिक कराडचे संभाषण या मुख्य मुद्यावर सीआयडीने भर दिला होता. तब्बल ५०० पानांचे रिमांड सीआयडीच्या वतीने दाखल करण्यात आले होते. आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील विधिज्ञ सिध्देश्वर ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष अभियोक्ता बी डी कोल्हे यांनी आरोपींच्या परस्पर संभाषणाची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे आग्रहीपणे मांडले. तब्बल दोन तास याबाबतचा युक्तीवाद सुरु होता. अखेर न्या. सुरेखा पाटील यांनी आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ML/ML/SL
15 Jan. 2025