पुढील वर्षभर जामीनासाठी अर्ज करू नका, सर्वोच्च न्यायालयाने बजावले वाल्मीक कराडला
नवी दिल्ली, दि. २६ : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला सज्जड दम दिला आहे. पुढील वर्षभर जामीनासाठी अर्ज करू नका, सर्वोच्च न्यायालयाने वाल्मीक कराडला बजावले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच या हत्येचा सूत्रधार असल्याचा उल्लेख आहे. आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे, त्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सवलत मिळू नये, अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात होती.