वाचन जीवनाच्या वाटा सुखकर करतात! वाचन-प्रेरणादिनी वाहतूक पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि १५: मुलाला शाळेत पाठवले नाही तर पालकांना दंड ठोठावणारे महाराष्ट्रातील पहिलेच राजे छत्रपती शाहू महाराज होय.हेच शिक्षणाचे महत्व जाणून मी प्रगती साध्य करीत गेल्याने,पोलीस क्षेत्रात महत्वाच्या पदावर काम करण्याची मला संधी लाभली आहे,अशा शब्दात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांनी येथे वाचन-प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रतिपादन केले.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने आज मनोहर फाळके सभागृहात वाचन प्रेरणादिन समारंभ पार पडला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने माजी राष्ट्रपती स्व.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाच्या औचित्याने वाचन प्रेरणादिन पार पडला.या कार्यक्रमाला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सरदार नाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला सरदार नाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्येविना मती गेली,या महात्मा फुले यांच्या घोषवाक्याचा आपल्या भाषणात उल्लेख करून सरदार नाळे पुढे म्हणाले,माणूस शहाणा व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही आणि शिक्षणा शिवाय माणूस संस्कारमय होणे अशक्य आहे आणि वाचनामुळेही जीवनाच्या वाटा सुखकर होत जातात.तेव्हा वाचन संस्कृती वाढविणे काळाची गरज आहे, असेही वाहतूक पोलीस निरीक्षक सरदार नाळे आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून गोविंदराव मोहिते म्हणाले,वाचन प्रेरणादिन, हा कार्यक्रम मुंबईच्या सर्व शाळांमध्ये राबविला गेला पाहिजे.राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले,हे महत्व आजच्या पिढीमध्ये रुजविले गेले पाहिजे, असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केलं. कथालेखक काशिनाथ माटल,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,नाट्य कलावंत राघवकुमार यांची तसेच वाचक सुनिता धुळगंडे, उषा सोहनी,शंकर मोरे यांची भाषणे झाली. उपाध्यक्ष बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,साई निकम आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. संघाचे संघटन सेक्रेटरी एम.पी. पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला, त्याशिवाय वाचनाची सातत्याने आवड जोपासणाऱ्या वाचकांचा प्रशस्ती पत्र आणि ग्रंथ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खजिनदार निवृत्ती देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.KK/ML/MS