संक्रातीच्या सुगड्यांचा उपयोग वृक्ष वाचविण्यासाठी
 
					
    वाशिम, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीत महिलांनी वापर केलेल्या सुगड्यांचा(मातीच्या भांड्याचा) वापर वृक्ष संवर्धनासाठी अनोख्या पद्धतीने उपयोग करून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम वाशीमच्या एस एम सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी यांनी हाती घेतला आहे. झाडांना सलाईन पद्धतीने पाणीपुरवठा करत संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमात सुगड्यांना झाडांच्या बुडात पुरून त्यात छिद्र पाडले जाते आणि कापसाची वा कपड्याची वात ठेवून पाणी हळूहळू झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवले जाते. या पद्धतीने पाणीपुरवठा केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, तसेच झाडांना आवश्यक ती आर्द्रता सहज मिळते.या यशस्वी उपक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे झाडांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.
ML/ML/SL
22 Jan. 2025
 
                             
                                     
                                    