परदेशी औषधांवर अमेरिका लावणार १००% टॅरिफ

मुंबई, दि. २६ : अमेरिकेने परदेशी औषधांवर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक औषध उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांच्या औषध निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या ट्रेड प्रतिनिधींनी हा प्रस्ताव सादर केला असून त्याचा उद्देश देशांतर्गत औषध उत्पादकांना संरक्षण देणे आणि आयातावर नियंत्रण ठेवणे असा आहे. या घोषणेमुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात औषध निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 26 सप्टेंबर रोजी भारतीय फार्मा कंपन्यांचे शेअर्स 5% पर्यंत कोसळले. ज्यामुळे Nifty Pharma index मध्ये सकाळच्या सत्रात 2.54% ची मोठी घट नोंदवली गेली.
या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अमेरिकेतील रुग्णांना स्वस्त औषधांचा लाभ घेणे कठीण होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारत हा जेनेरिक औषधांचा प्रमुख पुरवठादार देश असून अमेरिकेच्या औषध बाजारात त्याचा मोठा वाटा आहे.
औषध कंपन्यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय औषध उत्पादक संघटनांनी सांगितले की, “हा टॅरिफ केवळ व्यापारावर परिणाम करणार नाही, तर लाखो रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होईल. आम्ही सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी करणार आहोत.”
अमेरिकेच्या या धोरणामुळे जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि विविध आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. औषधांच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. भारतीय वाणिज्य मंत्रालयाने या निर्णयावर लक्ष ठेवले असून लवकरच अधिकृत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले की, या टॅरिफचा परिणाम केवळ औषध उद्योगावरच नव्हे, तर जागतिक आरोग्य धोरणांवरही होऊ शकतो.