अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका

मुंबई, दि. ८ : भारत आणि रशियामधील सौहार्दाचे व्यापारी संबंध न पाहवलेल्या अमेरिकेतील ट्रम्प सरकारने भारतावर तब्बल ५० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेतील बाजारपेठेच चांगल्याच महागणार आहेत. याचा मोठा परिणाम भारतीय वस्त्रोद्योगावर होणार आहे. मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्या परदेशातील कारखान्यांचा वापर करू शकतात, परंतु देशांतर्गत कारखान्यांवर अवलंबून असलेल्या निर्यातदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.
वृत्तसंस्था Reuters च्या वृत्तानुसार, ‘अमेरिकेतील खरेदीदारांनी आमच्यासोबतची डील थांबवलीये’, असे अग्रगण्य वस्त्र उत्पादक कंपनी ‘पर्ल ग्लोबल’ने म्हटले आहे. ‘पर्ल ग्लोबल’च्या अमेरिकेतील खरेदीदारांमध्ये Gap and Kohl’s सारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. पर्ल ग्लोबलच्या म्हणण्यानुसार, कपड्यांचा पुरवठा थांबवा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे मध्यरात्रीच (अमेरिकन वेळेनुसार सकाळी) फोन आले. काही कंपन्यांनी ईमेलद्वारे त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. वाढलेले शुल्क मालाच्या किंमतीतच सामावून घ्यावे किंवा तुमचे प्रोडक्शन भारताबाहेर अन्य देशांत हलवावे, असे अल्टिमेटम या कंपन्यांकडून दिले जात आहे.
वाढलेले शुल्क मालाच्या किंमतीतच सामावून घ्यावे, तसे न केल्यास माल स्वीकारला जाणार नाही, असे अमेरिकन खरेदीदारांचे स्पष्ट म्हणणे आहे. कारण वाढलेले शुल्क जोडल्यास भारतातून आयात केलेल्या वस्तूंची किंमत अमेरिकेत प्रचंड वाढेल, त्यामुळे ग्राहक मिळणार नाहीत. “ग्राहकांचे आम्हाला फोन येत आहेत, भारताबाहेर अन्य देशांत तुमचे प्रोडक्शन हलवा असा सल्ला ते देत आहेत”, असे पर्ल ग्लोबलचे व्यवस्थापकीय संचालक पल्लब बॅनर्जी यांनी सांगितले.
अमेरिकेतील मागणी पूर्ण करण्यासाठी पर्ल ग्लोबलने उत्पादन प्रक्रियेचा एक भाग बांगलादेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि ग्वाटेमाला येथील १७ कारखान्यांमध्ये हलवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, RichaCo Exports या भारतीय कंपनीने यावर्षी १११ दशलक्ष डॉलर (अंदाजे ₹९०० कोटी) मूल्याचे परिधान वस्त्र अमेरिकेला निर्यात केले आहेत. J. Crew Group यांसारख्या नामांकित ग्राहकांसाठी ही उत्पादने तयार करण्यात आली. ही सर्व उत्पादने भारतातल्या दोन डझनहून अधिक कारखान्यांमध्ये तयार करण्यात आली आहेत.
SL/ML/SL