अमेरिकेने थांबवली ७५ देशांतील नागरिकांची Visa प्रक्रीया
वॉशिग्टन डीसी, दि. १५ : अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने ७५ देशांतील नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे. यामध्ये रशिया ,ब्राझील यांसारख्या देशांचा समावेश आहे. ट्रंप प्रशासनाच्या मते, या निर्णयामागे अमेरिकेत ‘पब्लिक चार्ज’ बनण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांवर लक्ष ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी 21 जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी लागू होणार आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता काऊन्सलर अधिकारी आरोग्य, वय, इंग्रजी भाषेचे ज्ञान नसणे आणि आर्थिक परिस्थिती या आधारावर व्हिसा नाकारू शकतात. नवीन नियमांनुसार, वृद्ध किंवा जास्त वजन असलेल्या अर्जदारांनाही व्हिसा देण्यास नकार दिला जाऊ शकतो.
सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालय आता व्हिसा स्क्रीनिंग आणि तपासणी प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करेल. नवीन सुरक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहील. असे परराष्ट्र मंत्रालयाच्या मेमोनुसार समोर येत आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, अमेरिकन जनतेचा फायदा घेऊन कल्याणकारी योजनांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी अमेरिका आपल्या जुन्या अधिकारांचा वापर करेल.