राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन : शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या प्रवासात प्रत्येक पाऊल महत्वाचे
मुंबई, दि. 14 (राधिका अघोर) :ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठीच एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जेची गरज असतेच. मात्र इतर नैसर्गिक स्रोतांप्रमाणे सुरुवातीला ऊर्जा ही सहज आणि मुबलक उपलब्ध झाल्यामुळे, तिची किंमत वाटेनाशी झाली आहे. विशेषतः अतिपरिचयात अवज्ञा सारखं, सतत सहजी उपलब्ध होणारी ऊर्जा भविष्यात संपू शकते, याची जाणीवच आपल्याला उरलेली नाही. ही जाणीव करून देण्यासाठी, ऊर्जेचे महत्त्व आपल्याला समजावे आणि आपण ऊर्जा संवर्धन करावे, यासाठीच 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.
ऊर्जा, विशेषतः शाश्वत ऊर्जा संवर्धनासाठी, भारतात विशेष प्रयत्न केले जात आहेत.
तशी तर ऊर्जा शाश्वतच असते. मात्र ऊर्जेचे पारंपरिक नैसर्गिक स्त्रोत मर्यादित आहेत. मनुष्य जातीची वाढती संख्या आणि माणसांची ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेतली, तर लवकरच सध्या असलेला जीवाश्म इंधनाचा साठा संपून जाईल. कोळसा, लाकूड, तेल आणि इतर नैसर्गिक इंधनाचा साठा मर्यादित आहे, ही तर एक गोष्ट आहेच; शिवाय या सर्व संसाधनांमुळे नुकसान होते ते वेगळंच ! हवेत, भूमीत मोठ्या प्रमाणावर प्रदूध्णासाठी हे घटक कारणीभूत ठरतात.
तसेच ही संसाधने विकत घेण्यासाठी आपली भरपूर परदेशी गंगाजळी खर्च होते.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, भारताने अपारंपरिक किंवा स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. त्यासाठी सुनियोजित काम सुरू केलं आहे. जागतिक सौर ऊर्जा सहकार्य आघाडी स्थापन केली आहे. सौर ऊर्जेला महत्त्व देत, त्याचे प्रकल्प राबवले जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवल्या जात आहेत.
ग्रामीण भागात घराघरात चुलीवर होणारा स्वयंपाक प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरतो, आणि महिलांनाही त्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी उज्ज्वला योजनेद्वारे घरोघरी गॅस सिलेंडर दिले जात आहेत. तर उजाला योजनेतून घरोघरी एल ई डी लाईट बसवले जात आहेत. पवन ऊर्जा प्रकल्प ही राबवले जात आहेत.
सरकारी पातळीवर किंवा इतर संस्था काम करतच असल्या तरी नागरिक म्हणून ऊर्जा संवर्धन ही आपली अधिक जबाबदारी आहे, आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा,त्यात मोठे योगदान देऊ शकतो.
ऊर्जेची बचत आपण कुठे कुठे आणि कशी करु शकतो? तर, गॅस, दिवे, जळत न ठेवणे, सिग्नलवर गाडीचे इंजिन बंद करणे, शक्यतो जवळ पायी जाणे, वीजेचा वापर कमी करणे, इंधन वापरावर मर्यादा आणणे असे सगळे उपाय आहेत, जे आपण गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार ऐकत, वाचत आलो आहोत. त्यामुळे तेच तेच काय सांगणार? आणि काय ऐकणार? असा प्रश्न पडू शकतो. मात्र, आयुष्य चांगले जगण्यासाठी जसे काही धडे वारंवार आणि आयुष्यभर गिरवत बसावे लागतात, तसेच, हे ही धडे आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला घोटून घोटून पक्के करावे लागणार आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येने जर, जबाबदारीने ऊर्जा बचत आणि संवर्धनात आपला खारीचा वाटा उचलला, तर हा एकत्रित वाटा सिंहाचा वाटा ठरू शकेल.
मोठमोठी निवासी संकुले सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्प लावू शकतात. अनेक कंपन्या देखील आता पर्यायी इंधनचा वापर करु लागल्या आहेत. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
त्याशिवाय पर्यावरणस्नेही वस्तू आणि कपड्यांचा वापर, चक्राकार अर्थव्यवस्था म्हणजे, वस्तूंचा पुनः पुन्हा वापर, अशा गोष्टींनाही प्रोत्साहन द्यायला हवे. असे अभिनव उपक्रम राबवणाऱ्या लोकांचा केंद्रीय ऊर्जा विभाग, पुरस्कार देऊन गौरव करते.
यंदाही ऊर्जा संवर्धन दिनाच्या भव्य समारंभात 2024 या वर्षीचे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.हा भव्य समारंभ देशभरातील यासंदर्भातील अग्रणी आणि प्रभावशाली प्रकल्पांची कामगिरी समोर आणेल. या संस्थांनी ऊर्जा कार्यक्षमता कशी वाढवत आहेत आणि पर्यावरणीय शाश्वतेत कसे योगदान देत आहेत याबद्दल जाणून इतरांना त्यापासून प्रेरणा मिळेल.
ML/ML/PGB 14 Dec 2024