उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव*

पुणे, दि १८: त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल हा भव्य सांस्कृतिक सोहळा २१ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बालगंधर्व कला दालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवनाचे अग्रणी उर्ग्येन संघरक्षित (१९२५–२०१८) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ अस्मिता गायकवाड, मेडिकल डायरेक्टर फोर्ट्रिया USA यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला चंद्रशेखर दैठणकर (माजी.आय जी आय पी एस) डॉ. पद्माकर पंडित (मा.अधिष्ठाता वाय सी एम) डॉ. वि. दा. गायकवाड (मा.अधिष्ठाता कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे) संतोष संखद (दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता कला दिग्दर्शक) ध.तेजदर्शन निर्माता, सुप्रसिद्ध निवेदक दीपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.
‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयावर आधारित हा महोत्सव कला आणि धम्म यांचा संगम घडवणार आहे. प्रदर्शन, थेट कला सादरीकरणे, व्याख्याने, ध्यान कार्यशाळा आणि संगीत-नृत्य सादरीकरणांच्या माध्यमातून संघरक्षित यांच्या या विचाराला उजाळा दिला जाईल की कला ही आध्यात्मिक जाणिवेचे द्वार ठरू शकते. या महोत्सवात सहभागी होण्याकरिता देश व विदेशातून सुमारे 200 हून कलावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एक दूरदर्शी वारसा
उर्ग्येन संघरक्षित यांनी पूर्व आणि पश्चिम परंपरांचा सेतू बांधत आधुनिक बौद्ध धर्माला नवे आयाम दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांच्या लेखन, प्रवचन आणि सांस्कृतिक-आध्यात्मिक पुनरुज्जीवनाच्या कार्यामुळे भारतासह जगभरातील लाखो लोक प्रेरित झाले. KK/ML/MS