UPSC अध्यक्षांनी दिला राजीनामा

 UPSC अध्यक्षांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची निवड अवैध ठरवत काल UPSC ने त्यांची पोस्ट काढून घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने पूजा खेडकर तपास प्रकणातून अंग काढून घेण्यासाठी तर त्यांनी राजीनामा दिला नाही ना, अशी शंका उपस्थिक करण्यात येत आहे. मात्र UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. राजीनाम्यानंतर सामाजिक आणि धार्मिक कार्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १४ दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा कार्मिक विभागाकडे (DOPT) पाठवला होता, आज ही माहिती समोर आली आहे. राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. त्यांचा कार्यकाळ मे 2029 पर्यंत होता. 16 मे 2023 रोजी त्यांनी UPSC अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

राजीनाम्याची बातमी आल्यानंतर मनोज सोनी यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्याशी संबंधित वाद आणि आरोपांशी आपला राजीनामा कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. त्यांनी 28 जून 2017 रोजी आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता.

मनोज सोनी यांच्या कार्यकाळात IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि IAS अभिषेक सिंह वादात राहिले. या दोघांवर ओबीसी आणि अपंग प्रवर्गाचा गैरफायदा घेऊन निवड मिळवल्याचा आरोप होता. पूजा खेडकरची दृष्टी कमी असल्याने दिव्यांग प्रवर्गातून निवड झाली होती. अभिषेक सिंह यांनी दिव्यांग वर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी स्वत: ला लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजेच चालण्यास असमर्थ असल्याचे वर्णन केले होते. अभिनय कारकिर्दीसाठी अभिषेकने आयएएसचा राजीनामा दिला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यूपीएससीचे अध्यक्ष होण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची विनंतीही केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांची विनंती मान्य करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मनोज सोनी यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यांसाठी अधिक वेळ देण्याची इच्छा आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात स्पेशलायझेशन करणारे राज्यशास्त्राचे अभ्यासक मनोज सोनी यांनी सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर येथे १९९१ ते २०१६ दरम्यान अध्ययनाचे काम केले. यूपीएससीमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी मनोज सोनी यांनी तीन वेळा कुलगुरु म्हणून काम केले होते. १ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरातचे कुलगुरू म्हणून सलग दोन टर्मचा समावेश आहे; तर एप्रिल २००५ ते एप्रिल २००८ या कालावधीत बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे (एमएसयू) कुलगुरु म्हणून त्यांनी एक टर्म पूर्ण केली आहे. तिथे रुजू होताना सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरु ठरले होते.

SL/ML/SL

20 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *