मुंबई – गोवा महामार्गाच्या विषयावर विधानपरिषदेत गदारोळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) L मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी आज विधानपरिषद सभागृहात घोषणा दिल्या, यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या विभागातील ७२ टक्के काम पूर्ण झालं असून भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांचं काम प्रगतीपथावर* आहे, असं सांगितलं . इंदापूर ते झाराप या विभागाचं देखील ८५ टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित काम या डिसेंबर पर्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचं नियोजन आहे , अशी माहिती चव्हाण यांनी दिली मात्र हे सांगताना गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केल्याने त्यांनी या कामात अनेकदा अडथळा आणला यात तत्कालीन काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता ,याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं.
या कामात गैरव्यवहार करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी धोरणात्मक कारवाई करून चाप लावणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. मात्र या उत्तराने विरोधकांचं समाधान झालं नाही.
ML/ML/SL
28 June 2024