आर्टिकल ३७० वरून जम्मू- काश्मिर विधानसभेत गदारोळ
आर्टिकल 370 वरून जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी ७ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी पोस्टर्सदेखील फाडण्यात आले. दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.अपक्ष आमदार खुर्शीद शेख कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी फलक घेऊन सभागृहाच्या वेलमध्ये आले. खुर्शीद यांच्याकडून बॅनर काढून घेण्याच्या प्रयत्नात भाजपा आमदारांनीही वेलमध्ये धडक दिल्याने बाचाबाची झाली. सज्जाद लोन, वाहिद पारा आणि काही नॅशनल कॉन्फरन्स सदस्यांनीही खुर्शीद यांना समर्थन दिले. त्यामुळे भाजपाचे आमदार इतर आमदारांबरोबर भिडले. विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांच्या निर्देशनानुसार तीन आमदारांना वेलमधून बाहेर काढण्यात आले.