पत्रकार महेश उपदेव यांनी छंदापोटी ३९ वर्षात जमविले ९ हजार पेन !
मुंबई दि ३० : पत्रकार आणि लेखणी यांचा संबंध जीवाभावाचा. पूर्वी अनेक जण शाईचे पेन वापरीत असत. अताही काही जण शाईचे पेन वापरतात. परंतु ही लेखणी जमविण्याचा छंद जोपासणारे विरळाच, नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांनी हा छंद जोपासला असून गेल्या ३९ वर्षांत त्यांनी तब्बल ९ हजार लेखण्या जमविल्या आहेत.
आपण त्यांच्याच शब्दांत वाचू या. ते म्हणतात, “माणसाचा मेंदू आकाराने लहान असला तरी कर्तृत्वाने तो नेहमी श्रेष्ठ ठरत असतो, माणूस सदासर्वदा काहीतरी क्लुप्त्या शोधत असतो. काही माणसं त्याहीपलीकडे असतात अशा माणसांना मस्त कलंदर हे विशेषण शोभून दिसते. छंद जोपासणारी अनेक व्यक्ती आहेत. कुणी वेगवेगळ्या टाचण्या पासून पुरातन वस्तू गोळा करून आपला छंद जोपासत असतात. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी संकलनाचे वेड असते.
लहानपणापासून मला आपल्याजवळ चांगला पेन असावा असे वाटत होते. तेंव्हा परिस्थितीमुळे चांगला पेन मिळू शकला नाही. पेन विकत घ्यायला पुरेसे पैसे पण नसायचे. शाईच्या पेनची निब तुटली तर दुसरी निब वडील आणून देईपर्यंत पेन्सिलने काम करावे लागायचे. पण सुदैवाने माझ्यावर ती वेळ आली नाही. माझे बाबा नीबची डबीच आणून द्यायचे.
तेंव्हापासून आपल्याजवळ चांगला पेन असावा अशी इच्छा होती. पण परिस्थितीमुळे मला ते जमले नाही. १९८२ पासून मी नवनवीन पेन जमा करण्याचा निश्चय केला.
बास्केटबॉलचा पंच झाल्यानंतर किंवा इतर राज्यात स्पर्धा खेळायला गेलो की माझी नजर कोणत्या गावात किंवा राज्यात नाविन्यपूर्ण पेन मिळतो याकडे लक्ष असायचे. मी खेळाडू असल्यामुळे माझा छंद क्रीडा क्षेत्रातील वस्तू जमा करावा असा हवा होता. परंतु मला पेनचे वेड लागले. पंच म्हणून मिळालेल्या मानधनातून पेन खरेदी करायला लागलो.
आयुष्याच्या एका वळणावर मी पत्रकार झालो. पत्रकाराचे खरे शस्त्र असते ते म्हणजे पेन. पेन संग्रहित करणे हा माझा छंद झाला.
पेनांची श्रीमंती !
आज संगणकाचे युग आले असले तरी पेनाची किंमत कमी झालेली नाही. खिशात पेन असायलाच हवा. पेनची जागा आजही कोणतीही वस्तू घेऊ शकली नाही. गेल्या ३९ वर्षात माझ्या संग्रही ९ हजारांपेक्षा जास्त पेन जमा झाले आहे.
आज माझ्याजवळ बोरू, टाक पासून अत्याधुनिक पेन संग्रही आहेत. याचे जतन करणे माझ्यासाठी जिकरीचे झाले आहे, पाच रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंतचे पेन संग्रही झाले असून तीच माझ्याकरिता खरी श्रीमंती आहे.
माझ्या पेन संग्रहात एबोनाईट, हिरो, पारकर, क्रॉस, शेफर्ड, वॉटरमॅन, झेब्रा, मित्सुबिशी, लॅबे, रोटरिन्क, आर्किड, सिनेटर, रायटर, फ्लेयर, एडींग, बॉयर, कोपगॅट, कॅमलिन, लारा, रिटायर, हेलिकस, युनिबॉल इत्यादी देशी-विदेशी नामांकित कंपन्यांचे पेन संग्रहित आहेत.
लहानपणी बाबांनी मला टाक व भाला निब आणून दिली होती. ती आठवण मी विसरू शकत नाही. बाबांचे अक्षर वळणदार व मोत्यासारखे होते. त्यामुळे त्यांचे सांगणे असायचे की आपले अक्षर चांगले आणि वळणदार असले कि समोरच्या व्यक्तीवर आपला चांगला प्रभाव पडतो. त्यांनी दिलेला मंत्र मी आजही जपला आहे.
आंध्रप्रदेशातील हैद्राबाद सारख्या शहरात प्रचलित असलेला एबोनाईटचा पेन चलनातून दूर गेला असला तरी तो माझ्या संग्रही आहे. हा सर्व छंद मी मला मिळालेल्या मानधनातून जपला आहे.
माझ्या छंदाकरिता माझ्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे.
विविध रंगाचे विविध आकाराचे आखूड तर काही लांब, काही चपटे तर काही फुगीर काही पेन निस्तेज, शाईचे, बॉलपेन माझ्या संग्रही आहेत. वृत्तपत्रात काम करीत असल्यामुळे वृत्तपत्राच्या कागदाने गुंडाळी करून त्यात रिफील टाकून तयार केलेला पेन माझ्या संग्रही आहे. या पेन संग्रहावर आजपर्यंत ९ ते १० लाख रुपये खर्च झाले आहेत.
प्रोत्साहन !
माझ्या पेन संग्रहाची माहिती हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना कळल्यानंतर त्यांनी आपला प्रतिनिधी असीम सिंह याला माझ्या घरी पाठवले. हितवादच्या संडे प्लस पुरवणीमध्ये माझ्या पेन संग्रहाचा छायाचित्रासह लेख प्रकाशित केला होता. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर व सकाळचा पत्रकार केवल जीवनतारे यांनी आपल्या लेखणीतून माझ्या पेन संग्रहाची दखल घेतली होती. हे विशेष.
माझ्या पेन संग्रहाबाबतची माहिती हितवादमध्ये प्रकाशित झाल्यानंतर हा लेख वाचून करोडपती गल्लीमध्ये राहणारे विजयराव यांनी माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी आपल्या उपयोगात आणलेला एबोनाईटचा शाईचा पेन आपल्या घरी बोलावून मला भेट दिला होता. हा क्षणही मी कधीही विसरू शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्याजवळ असलेली कॅसिओ कंपनीचे एक घड्याळ मला भेट दिले होते. ते आजही माझ्या संग्रही आहे.
माझ्या पेन संग्रहाची दखल आजतक, स्टार माझा व अनेक वाहिन्यांनी घेतली होती. आजतक चे मनीष अवस्थी, स्टार माझाचे कौस्तुभ फलटणकर यांनी घरी येऊन माझ्या संग्रहाचे चित्रीकरण केले होते. आणि हे वृत्त आपल्या वाहिन्यांवर दाखविले होते.
शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी चीनमधून आणलेला मित्सुबिशी कंपनीचा पेन भेट दिला होता. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्या घरी भेट देऊन माझ्या पेन संग्रहाचे कौतुक करून मला माऊंटब्लॅक कंपनीचा पेन भेट दिला होता. तोही माझ्या संग्रही आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू संगीत डबीर हिने इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावरील स्टेडियममधून तेथील संग्रहालयात विक्रीला असलेला लॉर्ड्सच्या मैदानावरील पेन माझ्याकरिता आणून भेट दिला. तसेच माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले यांचा मुलगा पिनाकीन गोडबोले हा इंग्लंडला क्रिकेट खेळायला गेला होता त्याने माझ्याकरिता लॉर्ड्स मैदानाची प्रतिकृती असलेला पेन विकत घेऊन मला भेट दिला होता.
भाजपचे आमदार गिरीश व्यास हे पेनचे फार शौकीन असून त्यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ असलेले दोन पेन मला भेट दिले आहेत. माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक हे एका कामाकरिता हैद्राबादला जाणार होते, तेंव्हा त्यांना हैद्राबाद येथे एबोनाईटचा पेन माझ्याकरिता मिळाला तर बघा असे त्यांना सांगितले होते. त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून माझ्याकरिता सवड काढून दोन एबोनाईटचे पेन आणून मला भेट दिले. तेही माझ्या संग्रही आहेत.
माझे अनेक मित्र परदेशात आहेत, त्यांना माझ्या छंदाची माहिती असल्यामुळे ते विदेशातून हिंदुस्थानात आल्यानंतर त्या-त्या देशातील नाविन्यपूर्ण पेन माझ्यासाठी आवर्जून आणून मला भेट देतात हा माझा छंद जोपासण्याकरिता अनेक मित्रांची मदत मिळते.
कवी ग्रेस यांनी मा झी कॅलिग्राफी बघून मला एक कॅलिग्राफी पेनचा सेटच बक्षीस दिला. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेली ही भेट मी कधीच विसरू शकत नाही. नागपूर चे नामांकित डॉ निखील बालंखे, डॉ अभिषेक वैद्य यांनी ही मला काही पेन ची मदत केली आहे, माऊंट ब्लॉक, शेफर्ड, वॉटरमन सारख्या नामांकित कंपनीचे पेन माझ्या संग्रही आहे
घड्याळांचा छंद !
पेनासोबतच मला मनगटी घड्याळांचीही आवड असल्यामुळे माझ्याजवळ विविध प्रकारचे विविध कंपन्यांचे २५० पेक्षा जास्त मनगटी घड्याळ संग्रही आहेत यात स्पोर्टवॉचचा समावेश आहे. शाळांत परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या गरीब विद्यार्थ्याला माझ्याकडून एक पेन मी भेट देत असतो, असे महेश उपदेव आवर्जून सांगतात.ML/ML/MS