नेपाळमध्ये आंदोलकांनी संसद भवनाला लावली आग
काठमांडू,दि. ९ : कालपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाने आज अतिशय उग्र रूप धारण केले आहे. आंदोलकांनी संसदेला आग लावली. तरुणाईने भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदी विरोध केलेल्या आंदोलनात काल २० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवली असलेल्याचे जाहीर केले. मात्र तरीही तीव्र आंदोलन सुरूच आहे. आज हिंसक निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. याशिवाय, पंतप्रधान ओली, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या खाजगी निवासस्थानांची तोडफोड केल्यानंतर जाळपोळ करण्यात आली.
निदर्शकांनी घरात घुसून माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना मारहाण केली. त्याच वेळी, अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथ मारताना दिसत आहे.
या हिंसक घटनांमध्ये, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. लष्कराने त्यांना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी नेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
निदर्शकांनी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांनाही आग लावली.