केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट

नांदेड, दि.10( एम एमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड जिल्हयातील बोंडार गावात भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या रागातून दलित तरुण अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या घडल्याची निषेधार्ह घटना घडली. त्या गावात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत अक्षय भालेराव यांच्या घरी जावुन त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तेथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 4 लाख रुपये सांत्वनपर निधी देणार असल्याचे जाहीर केले. सामाजिक न्याय विभागातर्फे सव्वा आठ लाख रुपये मदत घोषीत करण्यात आली असुन त्यातील सव्वा चार लाखाचा धनादेश हा दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला.

मुख्यमंत्री निधीतुन त्यांना जास्तीतजास्त सांत्वनपर आर्थीक मदत राज्य शासनाने द्यावी. तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस कायस्वरुपी राज्य शासनाची नोकरी देण्यात यावी. अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्याकडे केली असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी शासनाकडे पाठवावा अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली.

यावेळी ना. रामदास आठवले यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी, नांदेडचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषदेचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याबाबत राज्य शासनाकडुन भरीव आर्थीक मदत देण्याबाबत तसेच दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील त्यांच्या लहान भावास शासकीय नोकरी देण्याबाबत सुचना केल्या आहेत. यावेळी दिवंगत अक्षय भालेराव यांचे आई वडिल, त्यांचा लहान भाऊ तसेच सर्व भालेराव कुटूंब उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय सोनवणे, मिलींद सितोणकर, प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, निखील कांबळे , शिवाजी भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.

बोंडार हवेली गावात गेल्या 70 वर्षापासुन भिमजयंती करण्यास सवर्ण समाजाचा विरोध होता. मात्र यंदा दिवंगत अक्षय भालेराव यांनी पुढाकार घेवून गावामध्ये पहिल्यांदाच आंबेडकर जयंती साजरी केली. तसेच आंबेडकर जयंतीनिमीत्त गावातुन मिरवणुक काढली. त्याचा राग म्हणुन दिवंगत अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या करण्यात आली . या घटनेचा निषेध रामदास आठवले केला. ही अत्यंत निंदनीय घटना असून महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारी घटना आहे.

महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून देश आणि विदेशात त्यांच्या ज्ञानाचा गौरव होत आहे. जगात त्यांचा ज्ञानाचे प्रतिक असा गौरव होत आहे. देशात सर्व पक्षाचे तसेच सर्व धर्मीयांचे लोक महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. मात्र महाराष्ट्रात नांदेड च्या बेंडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. गावातील सवर्ण समाजाची सुध्दा ही जबाबदारी आहे की त्यांनी समाजामध्ये सुध्दा सलोखा ठेवला पाहिजे. आमचा हाच प्रयत्न आहे की, समाजामध्ये सामाजिक सलोखा राखला जावा.

या प्रकरणात मात्र ज्या आरोपींनी दलित तरुणाची हत्या केली त्यांना फासावर लटविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दलितांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुध्द यांच्यावर जरब बसावा व सामाजिक सलोखा सुध्दा राहील. आणि या प्रकरणी पोलीसांनी चांगले काम केले असुन सर्व आरोपींना अटक केली आहे. केवळ एक आरोपी फरार आहे. त्याच्याही अटकेसाठी आपण पोलीस अधिका-यांशी बोललेला आहोत.

सर्व आरोपींना या गुन्हयात दोषी होवुन त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एड. उज्वल निकम यांची विशेष सरकारा वकील म्हणून नेमणुक करण्यासाठी आणि खटला जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे ना. आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

SW/KA/SL

10 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *