चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्या : युनियन ची मागणी
मुंबई दि २ : मुंबईतील “दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी एम्लॉईज युनियन यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना आणि रजा रोखीकरण यांसारखे सेवानिवृत्ती लाभ लागू करण्याच्या मागणी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
१९२७ साली स्थापन झालेली आणि बाल न्याय व बाल संरक्षण क्षेत्रातील ही मातृसंस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संस्थेला ‘राज्य सरकारची संस्था म्हणून मान्यता दिली आहे. संस्थेतील कर्मचारी हत्या, बलात्कार, मारहाण अशा गंभीर आरोपांतील मुलांची काळजी घेण्याचे संवेदनशील काम करतात, ज्यास राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिली आहे.
परंतु, गेल्या ५४ वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणारे मूलभूत सेवानिवृत्ती लाभ नाकारले गेले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कर्मचारी युनियनच्या प्रमुख मागण्यांमध्ये सीपीएफ बंद करून जीपीएफ योजना तात्काळ लागू करणे, २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करणे यांचा समावेश आहे. या निर्णयासाठी आवश्यक असणारी वार्षिक रक्कम केवळ ११ कोटी आहे. महिला बाल विकास विभागाने हा निधी सहाय्यक अनुदानातून उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र वित्त विभागाने किरकोळ कारणे दाखवून वारंवार प्रस्ताव परत पाठवला आहे. महिला बाल विकास मंत्री यांनी या विषयावर उपमुख्यमंतत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीची लेखी मागणी केली आहे.ML/ML/MS