ठाणे–कल्याण मार्गावरील भुयारी रेल्वे सुरू करण्याची योजना विचाराधीन
मुंबई, दि. १६ : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-़डोंबिवली स्थानकांतील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन एक महत्त्वपूर्ण आराखडा तयार करत आहे. प्रस्तावित ७वी आणि ८वी रेल्वे लाईन उभारणीदरम्यान काही भागात थेट भुयारी (अंडरग्राउंड) रेल्वे मार्ग टाकण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे. १०.८ किलोमीटर लांबीचा ठाणे-कल्याण रेल्वे पट्टा हा मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांपैकी एक असून दररोज सुमारे १,००० गाड्यांची ये-जा याच मार्गावरून होते. मुंबई महानगर क्षेत्राच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे दररोज १२ ते १५ लाख प्रवासी या मार्गावर अवलंबून आहेत. मात्र, जागेअभावी नवीन ट्रॅक टाकणे हे मोठे आव्हान बनले आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डोंबिवलीसारख्या दाट वस्तीच्या भागांमध्ये जमिनीवर नवीन ट्रॅकसाठी जागा उपलब्ध नसल्याने भुयारी रेल्वे लाईन हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र तांत्रिक संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून संबंधित संस्था ‘फायनल लोकेशन सर्वे’ (FLS) करत आहे. या सर्व्हेमधून नवीन रेल्वे लाईनचा अचूक मार्ग, ट्रॅकची स्थिती, तसेच पूल, बोगदे आणि इतर अभियांत्रिकी कामांचे तपशील निश्चित केले जाणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “FLS अभ्यासाला काही आठवडे झाले आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात आम्ही अत्यंत गजबजलेल्या कल्याण–ठाणे मार्गावरील नव्या लाईनच्या शक्यतांचा अभ्यास करत आहोत. काही भागांत जमिनीवर विस्तार शक्य आहे. मात्र डोंबिवलीच्या आधी आणि नंतरच्या काही पट्ट्यांमध्ये जागेची मोठी अडचण असून, तिथे भूमिगत मार्गाचा पर्याय गांभीर्याने तपासला जात आहे. FLS अहवाल २०२६ च्या मध्यापर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.”
SL/ML/SL