पुण्यात अनधिकृत अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट होस्टेलवर होणार कारवाई
पुणे, दि. ९ : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी वास्तव्य करतात. पुण्यातील काही भागांचे अर्थकारण तर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. असे असले तरीही आता पुणेकरांना या विद्यार्थ्यांचा त्रास होऊ लागला आहे. याला कारणीभूत ठरल्या आहेत ती गल्लोगल्ली सुरु झालेल्या अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट हॉस्टेल्स त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनधिकृत अभ्यासिकांवर महापालिकेतर्फे तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून, स्वतंत्र नियमावलीही केली जाणार आहे.
राज्यभरातून आलेले विद्यार्थी शहराच्या विविध भागांत राहतात; तसेच अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात. त्यांच्या वाहनांचे पार्किंग, काही विद्यार्थ्यांचे गैरवर्तन, स्पर्धा परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांकडून केला जाणारा गोंधळ व अन्य विविध कारणांमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या संदर्भात नुकतीच महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठक घेतली. विद्यार्थ्यांमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत व नागरिकांच्या तक्रारींबद्दल चर्चा झाली. १७ डिसेंबर रोजी आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
SL/ML/SL