नवरी मिळत नसल्याने लग्नाळूंनी काढला मोर्चा
सोलापूर,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती व्यवसायात दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे गावगाड्याचे अर्थचक्र ढासळत आहे. याचा दुष्परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. लग्नाचे वय उलटून गेले तरीही लग्नासाठी मुलगी मिळे ना. हे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भीषण वास्तव आहे. शेतकरी मुलांना आर्थिक स्थैर्य नसल्याने मुली शेतकरी नवरा नको रे बाबाअसे म्हणत आहेत. स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले आहे. त्यामुळे देखील लग्नासाठी मुलगी शोधताना अडचणी येत आहेत. ही सामाजिक प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही लग्नाळू तरुणांनी आज सोलापूरमध्ये एक अनोखा मोर्चा काढला.
सोलापूरातील ज्योती क्रांती सामाजिक संघटनेचे रमेश बारसकर यांच्या पुढाकारातून लग्नाळू तरुणांना नवरदेवाचा वेश धारण करून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मुंडावळ्या, फेटा, हातात कट्यार अशा नवरदेवाच्या वेशात घोड्यावर स्वार झालेले 25 हून अधिक युवक वाजत-गाजत सहभागी झाले होते.या मोर्चात काही युवकांनी बेटी, बचाओ, बेटी पढाओ असे लिहिलेले फलक हाती घेतले होते.
या अनोख्या मोर्चाचा व्हिडीओ सोशल मिडीया वरून व्हायरल झाला आहे.
SL/KA/SL
22 Dec. 2022