उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी
उल्हासनगर, दि ३: उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायींनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर काळ्या फिती लावून मुकनिदर्शने केली. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ऍड. कल्पेश माने यांनी दिला आहे.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर स्मशानभूमी कॅम्प -३ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बेकायदेशीरपणे बसवला गेला आहे. त्याच्या यथोचित परवानग्यां सहित, इतरत्र सुरक्षित व शोभनीय जागेत स्थलांतरणाकरिता अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी अनुयायी सनदशीर मार्गाने प्रशासना कडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर हे यासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणला दोन दिवस उलटून गेले. तरी देखील असंवेदनशील सरकार बधत नसल्याने आंबेडकरी अनुयायी यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर मुकनिदर्शने केली. या मुकनिदर्शनेत ऍड. कल्पेश माने, ऍड. राहुल बनकर, माजी नगरसेवक शांताराम निकम,पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कोरडे,कायद्याने वागाचे समन्वयक पत्रकार प्रफुल केदारे,पत्रकार कैलास झाल्टे, रवी होटकर, पोपट निकाम ,प्रदिप कपूर, सामाजिक कार्यकर्त्या संगिता मोहोड,सिंधुताई रामटेके,प्रिती भोसले आणि इतर उपस्थित होते. उल्हासनगर मध्ये शांतीनगर स्मशानभूमीत ज्यांनी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावला त्यांचा मुकनिदर्शनेत ऍड. कल्पेश माने यांनी तीव्र निषेध केला. या पुतळ्याचे त्वरित त्या ठिकाणावरून दुसरीकडे स्थलांतरित करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील ऍड. कल्पेश माने यांनी दिला आहे.JS/ML/MS