UGC ची भारतीय भाषा-केंद्रित शिक्षण प्रणाली
नवी दिल्ली,, दि. ८ : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि शिक्षण मंत्रालय एकत्र येऊन ‘इंग्रजी-प्रबळ चौकटीतून’ बाहेर पडून ‘भारतीय भाषा-केंद्रित शिक्षण प्रणाली’ विकसित करत आहेत. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी “आणखी एक भारतीय भाषा शिका” हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. या नव्या नियमांमुळे बहुभाषिक ज्ञान असलेल्यांना नोकरी आणि करिअरमध्ये चांगला फायदा मिळणार आहे.
शिक्षण मंत्रालयाने 2021 मध्ये स्थापन केलेल्या भारतीय भाषा समितीने (BBS) तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जारी केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांना या मार्गदर्शक सूचना त्वरित लागू करण्याची विनंती केली आहे.
सर्व उच्च शिक्षण संस्थांनी हे अभ्यासक्रम कौशल्य वाढवणारे अभ्यासक्रम, क्रेडिट अभ्यासक्रम किंवा इतर स्वरूपामध्ये किमान तीन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. यापैकी एक स्थानिक भाषा असणे आवश्यक आहे, आणि इतर दोन 22 अनुसूचीतील कोणत्याही भारतीय भाषा असू शकतात. पाच किंवा अधिक भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा उत्सव किंवा दीक्षांत समारंभात गौरविण्यात येईल, ज्यामुळे हे शिक्षण ‘अभिमान आणि सन्मानाची बाब’ बनेल. विशिष्ट प्राविण्य मिळवणाऱ्यांना शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) मध्ये नोंदणीकृत प्रमाणपत्रे मिळतील.
हे अभ्यासक्रम मूलभूत, मध्यम आणि प्रगत अशा तीन स्तरांवर लवचिक प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या पर्यायांसह दिले जातील, ज्यामुळे विद्यार्थी त्यांच्या वेगाने प्रगती करू शकतील. हा उपक्रम पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक, कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील इच्छुक लोकांसाठी आहे.
उच्च शिक्षण संस्था सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस (CIL) किंवा SWAYAM सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. तसेच, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी संस्थांनी नोंदणी, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संख्या आणि बहुभाषिक कौशल्य वितरण दर्शवणारे डॅशबोर्ड विकसित करावेत. स्वयंसेवक शिक्षकांना ‘भाषा बंधू’ किंवा ‘भाषा मित्र’ यांसारख्या मानद पदव्यांनी सन्मानित केले जाईल.
SL/ML/SL