UGC कडून बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
नवी दिल्ली, दि. २१ : दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय AI परिषदेत नोएडातील गलगोटीया या खाजगी विद्यापीठाने चीनी बनावटीचा रोबो कुत्रा आपणच तयार केल्याची मल्लीनाथी केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यापीठाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी जगभर यामुळे भारताची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक चिंतीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर UGC कडून देशभरातील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. UGC देशातील 12 राज्यांमध्ये पसरलेल्या 32 बनावट विद्यापीठांची ओळख पटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 2 वर्षांत अशा अनधिकृत संस्थांची संख्या 20 वरून थेट 32 वर पोहोचली आहे. या संस्थांना पदवी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रवेशाचा हंगाम जवळ येत असल्याने, विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यापीठात नाव नोंदवण्यापूर्वी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या संस्थेची मान्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकट्या दिल्लीत 12 बनावट विद्यापीठे सुरू आहेत. यामध्ये ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस’, ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ आणि ‘विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी’ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही संस्था तर सरकारी नियामक कार्यालयांच्या अगदी जवळ कार्यरत आहेत.
यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही अनेक बोगस संस्था सक्रिय आहेत. यामध्ये प्रयागचे ‘गांधी हिंदी विद्यापीठ’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ यांचा समावेश आहे. या यादीत आता हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांना बोगस घोषित करण्यात आले असून कर्नाटकच्या बेंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी’बाबत विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
SL/ML/SL