उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान

मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. उद्योग विभागाच्यावतिने देण्यात येणारे उद्योगरत्न’, ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉल येथे प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव, उद्योग विभाग हर्षदीप कांबळे उपस्थित होते. पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला. तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.’उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये , सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये,सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.यावेळी राज्यपाल बैस यांनी महत्त्वाचे ‘उद्योग पुरस्कार’ सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि राज्याच्या उद्योग विभागाचे अभिनंदन केले. कालच रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देण्यासाठी भारतीय उद्योगक्षेत्रात रतन टाटा यांच्यापेक्षा चांगला माणूस असूच शकत नाही असेही ते म्हणाले. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून, भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे. जगातील अनेक विकसित देश वृद्ध होत आहेत. ते त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. कौशल्य विकासात उद्योग भागीदारी आवश्यक आहे.भारत स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पाऊल ठेवत असताना, महाराष्ट्राच्या पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी नेते, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीचे स्वागत होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे अद्योगिक वातावरण राज्यात निर्माण होईल अशी आशा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

ML/KA/PGB 20 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *