पोहरादेवी येथे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा
वाशिम, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जगदंबा मातेचे दर्शन घेतले सोबतच त्यांनी जगदंबा माता, संत रामराव महाराज, बामनलाल महाराज, जेतालाल महाराजांचे दर्शन घेऊन विदर्भ दौऱ्याचा प्रारंभ केला.
यावेळी महंत सुनील महाराज यांनी पारंपारिक बंजारा पध्दतीने फेटा घालून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. तसेच पोहरादेवी येथे ठिकठिकाणी लेंगी या बंजारा लोकनृत्याने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, शिवसेना वाशीम जिल्हा प्रमुख डॉ.सुधीर कव्हर, जिल्हा समन्वयक सुरेश मापारी यांच्यासह वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.
तुमचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. आज माझ्याकडे पक्ष नाही मात्र तुमचे प्रेम आणि विश्वास त्यापेक्षा अधिक आहे. आपला लढा हा सत्यासाठी असून तो आपण नक्कीच जिंकू असा ठाम विश्वास द्यायला मी आज आलोय असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केले. पोहरादेवी येथील दर्शन आटोपून उद्धव ठाकरे हजारो समर्थकांसह दिग्रस येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी रवाना झाले.
ML/KA/PGB
9 July 2023