उद्धव ठाकरेंचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न

 उद्धव ठाकरेंचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न

कणकवली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये आणि चित्र उभे करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची घणाघाती टीका आ. दरेकर यांनी केली.
कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. दरेकर म्हणाले की, कालच उद्धव ठाकरे यांची वज्रमुठ सभा झाली. खरं म्हणजे ही वज्रमूठ दाखवायला आहे. परंतु कुठल्याही प्रकारचा एकोपा, एकसंघपणा या महाविकास आघाडीत दिसून येत नाही. कालच्या सभेला राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित होते. पण पूर्ण सहभाग असा राष्ट्रवादीचा दिसून आला नाही. त्यामुळे भाजपा आणि शिंदेंचे जे आव्हान आहे ते परतवण्यासाठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सभांच्या माध्यमातून होत असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सभेत नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आगपाखड केली. टोमणे, मत्सर तर होतेच. परंतु काही गोष्टींचा उद्धव ठाकरे यांनी भाषणात जो उल्लेख केला तो करत असताना वस्तुस्थितीही लक्षात घेणे गरजेचे आहे. नेहमीप्रमाणे मुंबईचा लचका तोडायचाय, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे म्हटले. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे भावनिक वातावरण, सहानुभूती निर्माण करून मतं मिळविण्याचा दुर्दैवी प्रयत्न होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे जाहीर इशारा दिला होता की, कुणाच्या बापाची हिंमत नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची. आम्ही सर्वजण कोण आहोत? त्यामुळेच केवळ मुंबईचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही या मातीतले, भूमीतले आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे चित्र उभे करून सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसत असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.

दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई बदलतेय, मुंबईचे स्वरूप बदलत आहे. स्वच्छ, सुंदर मुंबई होतेय. मुंबईच्या ठेवी आमच्या बापाच्या नाहीत तर त्या तुमच्याही बापाच्या नाहीत. त्या ठेवी मुंबईकरांच्या आहेत. त्या मुंबईकरांच्या कामी येणार नाहीत मग कुणाच्या कामी येणार? ते काय प्रॉफिट बॅकिंग इन्स्टिट्युशन आहे का? असा सवालही दरेकर यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यचाही दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. माझी उद्धव ठाकरेंना विचारणा आहे की आपला कुठलाही उद्योग व्यवसाय नसताना एकाच्या दोन मातोश्री कशा होतात. याबाबत मार्मिकमध्ये लेखमालिका चालवली तर बरे होईल. सामनात संजय राऊत यांना सांगून रोखठोकमध्ये लिहिलेत तर निदान झेंडा नाचवीणारा शिवसैनिक श्रीमंत होईल.

दरेकर पुढे म्हणाले की, बुलेट ट्रेन, मेट्रोसंदर्भात भाष्य केले गेले. मला सांगायला अभिमान वाटतो की, ज्यावेळी शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले त्यावेळी १२ हजार कोटी रुपये आणि कर्जाला ५० हजार कोटींची थकहमी देण्याचा पहिला निर्णय मुंबईच्या मेट्रोला देण्यासाठी झाला. त्यामुळे विकासभिमुख हे सरकार आहे. हे गेल्या दहा महिन्यातील काम पाहिल्यावर लक्षात येईल. आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दरेकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना साक्षात्कार झालाय लवकर सरकार जाणार. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ त्यांनी पाहत राहावे. आदित्य ठाकरे यांनी बोलताना कंत्राटदारांवर टीका केली. टेंडरसंदर्भात भाष्य केले. महापालिका ३० वर्ष यांच्या हातात होती. किती कंत्राटदार जपलेत व किती मराठी कंत्राटदारांना उभे केलात याची यादी जाहीर करावी. मातोश्रीतून टेंडर होत होते आणि हे आमच्यावर आरोप करतात. कारण यांचे बारीक लक्ष टेंडरवर आहे, अशी कोपरखळीही दरेकर यांनी लगावली. तसेच शिंदे-फडणवीस यांचे सरकार भक्कम आहे. भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेना पक्षात चांगला समन्वय आहे. कुठलाही बेबनाव नाही. पुढील ५ वर्ष भाजपा आणि शिवसेनेचेच सरकार येणार आहे, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी दरेकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालावरून बोलताना म्हटले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीची संख्या सांगतात त्यांनी आधी स्वतःचा पक्ष किती अधोगतीला गेलाय ते पाहावे. भाजपा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. ग्रामपंचायत, नगरपालिकेतही पक्ष पहिला होता. परंतु गोळा बेरीज करून आम्ही कसे मोठे आहोत अशा प्रकारचे चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरेंची भुमिका दुटप्पी

दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बारसुच्या बाबतीत पत्र दिलेय. प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे कबूलही केले आहे. मात्र नंतर लोकं सांगतील असे म्हटले. म्हणजे नेमकी भुमिका काय आहे? उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भुमिका कोकणवासियांना मान्य नाही. भुमिका एक असणे आवश्यक आहे. ती घेताना उद्धव ठाकरे अजिबात दिसत नाहीत.Uddhav Thackeray’s desperate attempt to ride on sympathy

ML/KA/PGB
2 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *