उध्दव ठाकरे यांनी आळवला हिंदुत्वाचा राग, मोदी सरकारवर केली टीका

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आळवला असून बांगलादेशात आणि देशांतर्गत हिंदूंच्या मंदिरांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार याकडे मोदी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. यांचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित आहे का असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू धार्मिक जनतेवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. तिथे इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले, हिंदूंवरती अत्याचार होत आहेत आणि इस्कॉनच्या प्रमुखाला अटक देखील करण्यात आलेली आहे , मात्र भारत सरकार या संदर्भामध्ये कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे हिंदुत्व कोणाचे बेगडी आहे हे दिसून येते असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
यासोबतच नवी मुंबईतील सिडकोच्या मंदिरासाठी आरक्षित जमिनीचा भूखंड अन्य कोणाला तरी देण्याचा घाट घातला जात आहे आणि मुंबई, दादर इथल्या रेल्वे स्थानकाच्या जागेत हमाल मंडळींनी बांधलेले जुने हनुमान मंदिर हटवण्यासाठी नोटिसा दिला जात आहेत यावरून हिंदू धर्माबद्दल चे प्रेम किती ऊतू जात आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान आमच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीची वेळ मागितली होती आणि त्यामार्फत बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचार यासंदर्भात काही ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येणार होती. मात्र मोदी यांनी भेट नाकारली आहे त्यामुळे त्यांना नेमकी कामे तरी किती आहेत आणि ते नेमक्या कोणत्या कामात व्यस्त आहेत असेही प्रश्न उपस्थित होतात असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टी करण्यापेक्षा देशभरात आणि देशाबाहेर हिंदू वरती होणारे अत्याचार याकडे मोदींनी जास्त लक्ष द्यायला हवे. अन्यथा तुमचे हिंदुत्व हे केवळ कटेंगे तो बटेंगे या निवडणुकीतील घोषणेपुरते मर्यादित असून निवडणुका संपल्या की हिंदूंना वाऱ्यावर सोडणे ही तुमची वृत्ती असल्याचे निदर्शक आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. ठाकरे यांनी आपल्या या पत्रकार परिषदे मध्ये केवळ हिंदुत्वावरती जोर दिल्यामुळे त्यांच्या पक्षाच्यापासून दुरावलेले हिंदू मतदार पुन्हा एकदा जोडण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा राग आळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
ML/ML/SL
13 Dec. 2024