उड्डाणपुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक
मुंबई, दि २६
ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने पूल उभारणी यशस्वीपणे केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देशभरात अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणा-या, महिलांची फौज तयार करणा-या, माहेश्वरी साडी उद्योगाला प्रोत्साहन देऊन औद्योगिक विकास घडविणा-या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ युद्धकुशलता नाही, तर समाजकल्याण, धर्मरक्षण आणि आर्थिक प्रगती यांद्वारे आदर्श राज्यकारभार, उत्तम प्रशासक कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या कार्यास वंदन करण्यासाठी या उड्डाणपुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल’ हे करण्यात यावे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिकेने करावी, असे निर्देश देखील श्री.फडणवीस यांनी दिले.
ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज (दिनांक २६ फेब्रुवारी २०२६) करण्यात आले. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री संबोधित करत होते. आमदार श्री. गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच स्थानिक आमदार श्री. अमीन पटेल, उप महापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्ष नेता श्रीमती किेशोरी पेडणेकर, समाजवादी पक्ष गटनेता तथा स्थानिक नगरसेविका श्रीमती अमरीन अब्रहानी, स्थानिक नगरसेवक श्री. संतोष ढाले, स्थानिक नगरसेविका श्रीमती राजश्री भाटणकर, नगरसेवक श्री. अजय पाटील, उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पंकज सिंह, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. मनीष वळंजू , प्रमुख अभियंता (पूल) (प्रभारी) श्री. राजेश मुळे यांच्यासह अन्य मान्यवरदेखील उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्यासह विविध मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल जवळपास १३० वर्षे जुना झाला होता. त्याचे आयुर्मान पूर्णपणे संपले होते. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. हा पूल बांधण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आणि अतिशय वेगाने पूर्ण केले. दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेले पुलाचे काम दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी म्हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण झाले. विशेषतः रेल्वे हद्दीतील कठीण कामकाजदेखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व अधिकारी, अभियंते यांचे कौतुक आहे. मुंबई महानगरात सध्या गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील उड्डाणपुलाची गोरेगाव बाजू, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल, शीव (सायन) रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी रेल्वे उड्डाणपूल, नेहरू तारांगण आणि मानखुर्द उड्डाणपूल या विविध ठिकाणचे ६ मोठे उड्डाणपूल निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून नजिकच्या कालावधीत या सर्व पुलांचे लोकार्पण केले जाईल, ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापुढेही विकास कामे गतीने आणि गुणवत्तापूर्वक करण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देशदेखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या रेल्वे उड्डाणपुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे उड्डाणपूल’ असे करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशाला एक आदर्श प्रशासक कसा असावा, हे दाखवून दिले. त्यांची संवेदनशीलता, पारदर्शक कारभार, त्यांनी तयार केलेली महिलांची पहिली लष्करी तुकडी, माहेश्वरी साडी, लघू उद्योग आणि देशभरात बांधलेली मंदिरे व घाट हे त्यांच्या महान कर्तृत्वाचे प्रतीक आहेत. अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यापुढेही जनहिताची कामे करत राहील, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, या पुलाचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता महानगरपालिकेने घेतली. त्यामुळे पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. जहांगीर बोमन बेहराम मार्ग, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्पाची कामे वेगाने पुढे जात आहेत. रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. या पुढील कालावधीत देखील सर्व विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत, मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे करावीत, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.
महापौर श्रीमती रितू तावडे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना म्हणाल्या की, मुंबईतील रस्ते, उड्डाणपूल म्हणजे या महानगराच्या धमन्या आहेत. मुंबई महानगराचा विस्तार, लोकसंख्येची घनता, वाहनांची संख्या इत्यादी लक्षात घेता या धमन्या महत्त्वाच्या आहेत. हा पूल बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत, मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण करुन दाखवला आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन, पूल विभाग कौतुकास पात्र आहेत. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मोलाचे ठरले. पूल विभागाशी संबंधित सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांचेही या विक्रमी कामगिरीमध्ये आपापले योगदान आहे. त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस व इतर सर्व यंत्रणांनी केलेले सहकार्य आणि साधलेला समन्वय होय, असे श्रीमती तावडे यांनी नमूद केले.KK/ML/MS