मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती

 मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती

मुंबई, 4
गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील गुरु गोविंद सिंग मार्गावर उन्नत चक्रीय मार्गासह तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे केबल – स्टेड संरचनेसह उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल दरम्यान सुमारे १.८९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. मुख्य उड्डाणपुलासाठी एकूण ४८ खांब प्रस्तावित असून त्यापैकी ३९ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच उड्डाणपुलाच्या एकूण ४७ अंतरखंडांपैकी १० अंतरखंडांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच मुख्य उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर दोन छोटे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ही सर्व कामे समांतरपणे पूर्ण करून मुलुंड भागातील गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाची संपूर्ण कामे दिनांक १५ जून २०२७ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोट्या उड्डाणपुलाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावे. हा छोटा उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, असे निर्देशही श्री. बांगर यांनी दिले आहेत.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (GMLR) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल अंतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. तिस-या टप्‍प्‍यातील भाग अ मध्‍ये मुलुंड (पश्चिम) खिंडिपाडा येथील गुरु गोविंद सिंग रस्‍त्‍यावरील उन्‍नत चक्रीय मार्ग व डॉ. हेडगेवार चौक येथे केबल स्‍टेड यांच्‍यासह उड्डाणुलाची संरचना व बांधकामे आदींचा समावेश आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक ४ फेब्रुवारी २०२६) मुलुंड (पश्चिम) येथील सोनापूर जंक्‍शन येथे भेट देऊन उड्डाणपूल प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता कामामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानाच्या खालून जाणा-या ४.७ किलोमीटर लांबीच्या १३ मीटर अंतर्गत व्यासाच्या जोडबोग‌द्याचा व दादासाहेब फाळके चित्रनगरीमधून जाणारा १.६० किलोमीटर लांबीच्या पेटी बोगदा आणि त्यांचे पोहोच रस्त्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंना उड्डाणपूल उभारले जात आहेत. गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्यावर होणारी संभाव्य वाहतूक विचारात घेऊन गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून रत्नागिरी हॉटेल चौकावरून जाणारा १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्‍यात येत आहे. गोरेगाव भागातील हा उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

तर, या प्रकल्पाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मुलुंड भागातील उड्डाणपूल होय. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अधिक आव्हानात्मक आहे. डॉ. हेडगेवार चौक येथे १२० मीटर लांबीचा पूल हा ‘केबल स्टेड’ स्वरुपाचा असून ‘मुंबई मेट्रो – ४’ च्या खालील पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर प्रस्तावित आहे. मुख्‍य उड्डाणपूल प्रकल्पाचे एकूण तीन प्रमुख भाग आहेत. मुख्य उड्डाणपूल तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर उभारले जाणारे दोन छोटे उड्डाणपूल अशी विभागणी आहे. यापैकी उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोटा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

सद्यस्थितीत मुख्‍य उड्डाणपूल कामासाठी वाहतूक वळविण्‍यात आली आहे. अरुंद भुयारी मार्गातून वाहतूक सुरू आहे. त्‍यामुळे या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येणा-या पावसाळ्यात ही समस्‍या अधिक गंभीर होऊ शकते. याचा विचार करता मुख्‍य उड्डाणपुलाच्‍या उत्‍तरेकडील तानसा जलवाहिनीवर छोटा उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी सुरू केल्‍यास वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरळीत होण्‍यास मदत होईल. हे उद्दिष्‍ट गाठण्‍यासाठी सूक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले आहे. हा छोटा उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाईल. त्‍यानंतर मुख्‍य उड्डाणपुलाच्‍या दक्षिणेकडील तानसा जलवाहिनीवरील दुस-या छोट्या पुलाचे काम हाती घेतले जाईल, असे देखील श्री. बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.

या पाहणीनंतर श्री. बांगर यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्‍या ‘लॉन्चिग शाफ्ट’ खोदकामाच्‍या कार्यस्‍थळास भेट दिली. या प्रकल्पासाठी भूमिगत जुळ्या बोगद्यांचे बांधकाम करण्याकरिता दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे (Tunnel Boring Machines) वापरण्यात येणार आहेत. खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून मार्च २०२६ मध्‍ये बोगदा खनन संयंत्र ‘शाफ्ट’ मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. बोगदा खनन संयंत्र ‘शाफ्ट’ मध्ये उतरविण्यासाठी आवश्यक खोदकाम पूर्ण झाले असून आता बोगदा खनन संयंत्र कार्यान्वित (Launching) करण्‍याकामी साचा (Cradle) यांचे काम सुरू करण्‍यात आले आहे. बोगदा खनन संयंत्र उतरविण्‍यासाठी ८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन (Crane) आवश्‍यक आहे. पैकी ३५० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन कार्यस्‍थळी दाखल झाली आहे. दुसरी क्रेन दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. ही सर्व कामे पूर्ण करून मार्च महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात बोगदा खनन संयंत्र उतरविण्‍याची प्रक्रिया सुरू केली जाईल.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *