मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणं प्रस्तावित

मुंबई, दि. ४ : मुंबई महानगराच्या वाढत्या लोकसंख्येच्या विचार करुन भविष्यात लागणार्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दोन नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव आहे.पालघर (Palghar)जिल्ह्यातील पिंजाळ आणि गारगाई नद्यांवर ही दोन धरणे बांधण्याची योजना आहे.
पुढील १६ वर्षापर्यंत म्हणजे २०४१ पर्यंत मुंबईकरांना दररोज ६५३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच पालिकेने आता नवीन दोन धरणांचा प्रस्ताव तयार केला आहे. २०१४ मध्ये बांधलेल्या मध्य वैतरणा धरणानंतर पालिका बांधत असलेली ही पहिलीच दोन धरणे असतील.पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खिडसे परिसरात पिंजाळ नदीवर एक धरण बांधले जाणार आहे. तर दुसरे धरण पालघर जिल्ह्यातीलच वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर असणार आहे. गारगाईचे पाणी तेथून भूमिगत बोगद्याद्वारे मोडकसागर तलावात आणले जाईल.