महायुतीचे दोन मंत्री वादाच्या भोवऱ्यात, मंत्रीपद जाण्याची शक्यता

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारचे विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्या आलेल्या दोन खात्यांचे मंत्री वादाच्या चांगलेच बोऱ्यात सापडले असून एका मंत्राला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर दुसऱ्या मंत्राच्या कथित पत्नीने त्याच्या विरोधात उपोषणाची धमकी दिली आहे यामुळे त्या दोघांचे मंत्रिपद जाते की काय याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याचे मंत्रिपद संकटात सापडले आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीवर टांगती तलवार आहे. कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो.
दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे.
काही दिवासांपूर्वी धनंजय मुंडे-करुणा यांच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयानं निर्णय दिला होता. करुणा यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आला होता. यानंतर करुणा यांच्याकडून न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. बीड निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात कौटुंबिक आणि मालमत्तेसंदर्भात माहिती देताना ती चुकीची दिली होती, असा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करुणा यांनी केली होती. या मागणीसाठी त्या मुंडेंविरोधात आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. अधिवेशनाआधीच करुणा उपोषणाला बसणार असल्याने मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, विरोधकांकडूनही त्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं.
ML/ ML/ SL
20 Feb. 2025