महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प
दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग घेताना दिली.
केंद्र शासनाने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही आज सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात गृह आणि ग्रामविकास विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, ही बाब अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.Two lakh crore projects in Maharashtra
प्रधानमंत्री म्हणाले, ‘विकसित भारत होण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुद्रा योजनेद्वारे तरूणांना स्वयंरोजगारासाठी 20 लाख करोड रूपयांची मदत केली. याचा मोठा लाभ महाराष्ट्रातील तरुणांनाही झाला. स्टार्टअप, लघु उद्योग यासाठी शासन मदत करीत आहे. ग्रामीण भागातील बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. मागील आठ वर्षात आठ कोटी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करीत आहेत. बचत गटांना साडेपाच लाख कोटीची मदत दिली गेली आहे. त्यामुळे उत्पादन निर्मिती व रोजगार निर्मितीही होत आहे.
पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रूपये व रस्ते विकासासाठी 50 हजार कोटी रूपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असे मोदी म्हणाले.
ML/KA/PGB
3 Nov .2022