CRPF च्या दोन श्वानांचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा पॅरिस ऑलिंपिकच्या सुरक्षा चमूमध्ये समावेश

 CRPF च्या दोन श्वानांचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा पॅरिस ऑलिंपिकच्या सुरक्षा चमूमध्ये समावेश

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, त्यांच्या सपोर्ट टिम आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारे प्रेक्षक यांच्या सुरक्षेची सुसज्ज व्यवस्था केली जात आहे. भारतासाठी याबाबतची विशेष माहिती म्हणजे पॅरिस ऑलिंपिकची सुरक्षा करणाऱ्या श्वानांच्या आंतरराष्ट्रीय चमूमध्ये भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या म्हणजेच CRPF च्या दोन श्वानांचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. ५ वर्षे वयाचा वत्स व ३ वर्ष वयाच्या डेन्बी या बेल्जियन शेफर्ड मालिनॉइस जातीच्या श्वानांचा के ९ पथकात समावेश करण्यात आला असून या पथकात जगातील सशस्त्र पोलीस दलाच्या एकूण १० पोलीस श्वानांचा समावेश करण्यात आला आहे.

या पथकातील १० श्वान जगाच्या विविध भागातून आणण्यात आले असून हे दोन्ही श्वान आपल्या तेथील प्रशिक्षणासाठी त्याचप्रमाणे फ्रान्सचे वातावरण व फ्रेंच भाषेतील आदेशांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पॅरिसला पोहोचले आहेत. वत्स व डेन्बी यांचे प्रशिक्षण बेंगळुरु जवळच्या तरालू येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात झाले होते. हे दोन्ही श्वान पॅरिसमध्ये ११ ऑगस्टपर्यंत राहणार आहेत. फ्रान्स सरकारच्या विनंतीवरुन या के ९ पथकाची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्यावर ऑलिंपिक दरम्यान होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे माग काढण्यासाठी करण्यात आली आहे. फ्रान्स च्या सुरक्षा रक्षकांच्या कामामध्ये हे श्वान पथक मदत करणार आहे.

बेल्जियन शेफर्ड मालिनॉइस ही श्वानाची प्रजाती त्यांची क्षमता, शक्ती आणि कौशल्यासाठी प्रसिद्ध असून याच जातीच्या श्वानांनी या आधी ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा शोधून काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आयएस प्रमुख अबु बख्र बगदादी याचा बोगद्यात पाठलाग करण्यातही याच श्वानांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर बगदादीचा खात्मा करण्यात आला होता.

दरम्यान भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने काही दिवसांपूर्वीच 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. नीरज चोप्रासोबत किशोर जेनाही भाल स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अन्नू राणी पॅरिसमध्ये झालेल्या भालाफेक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय ऍथलेटिक्स संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे.

SL/ML/SL

18 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *