डिजिटल व्यवहारात महाराष्ट्रातील दोन शहरे आघाडीवर

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुलभता आणि विश्वासार्हता यांमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांचे प्रमाण आता वाढले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांनी देशातील सर्वाधिक पाच महानगरांच्या डिजिटल ट्रान्झाक्शन्स झालेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
गेल्या वर्षी ग्राहकांनी केलेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये उपाहारगृहे, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, मेडिकल, दागिन्यांची दुकाने, सुपरमार्केट, घरगुती उपकरणांचे दुकाने यांचा समावेश आहे. त्यात उपाहारगृहांमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले आहेत. ऑनलाइन व्यवहारांमध्ये ई-कॉमर्स, वित्तीय सेवा, शिक्षण, पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्रांमध्येही जास्त उलाढाल नोंदवण्यात आली.
देशात जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सर्वाधिक डिजिटल आर्थिक व्यवहार होणाऱ्या महानगरांची यादी ‘वर्ल्डलाईन इंडिया’ने जाहीर केली आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक डिजिटल आर्थिक व्यवहार बंगळुरूमध्ये झाले. त्या खालोखाल नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि चेन्नईने स्थान मिळवले आहे. देशात गेल्या वर्षी डिजिटल व्यवहारांची संख्या यूपीआयमुळे मोठ्या प्रमाणात वाढली. मागील वर्षी यूपीआय, कार्ड, पीपीआय अशा मार्गाने एकूण १४९.५ ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले.
देशात मागील वर्षी सर्वाधिक २.९ कोटी डिजिटल व्यवहार बंगळुरूत झाले. त्यांचे एकूण मूल्य ६५ अब्ज रुपये होते. त्यानंतर दिल्लीत १.९६ कोटी व्यवहार झाले आणि त्यांचे मूल्य ५० अब्ज रुपये होते. मुंबईत १.८७ कोटी व्यवहार झाले आणि त्यांचे मूल्य ४९.५ अब्ज रुपये होते. पुण्यात मागील वर्षी दीड कोटी डिजिटल व्यवहार झाले. हे व्यवहार एकूण ३२.८ अब्ज रुपयांचे होते. चेन्नईत १.४३ कोटी व्यवहार झाले आणि त्यांचे मूल्य ३५.३ अब्ज रुपयांचे होते.