मुंबई विमानतळ परिसरात दहा कोटींचे साडेबारा किलोचे सोने जप्त, सहा जणांना अटक
सोने तस्करीप्रकरणी सहाजणांच्या एका टोळीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा कोटी किंमत असलेले साडेबारा किलोचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई विमानतळावर असलेल्या फूड स्टॉलच्या तीन कर्मचाऱ्यांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी विमानतळाबाहेर असलेल्या तीन रिसीव्हर्सना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांना आठ पाऊचमध्ये ठेवलेले चेंडूच्या आकाराचे २४ सोन्याचे गोळे मिळाले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. साडेबारा किलो वजनाच्या या सोन्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे. तिन्ही कर्मचारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत असून त्यांच्यावर सोने विमानतळावर आणून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.