मनोज जरांगे पाटील यांना दिला TVJA ने अल्टिमेटम.
मुंबई दि १– TV जर्नालिस्ट असोसिएशन शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या मागणी संदर्भातील आंदोलन सगळेजण इथे कव्हर करत आहेत. मात्र आपल्या पत्रकार महिला भगिनी आणि बंधू तसेच कॅमेरामन बंधूंना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तो न थांबल्यास आंदोलनाच्या बातम्या करणे थांबविले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सातत्याने बूम बरोबर येऊन फोटो काढणे, ज्या ठिकाणी आपले कॅमेरामन उभे आहेत त्यांना मागून दगड मारणे, त्यांचे कपडे ओढणे पॅन्ट खेचणे, महिला पत्रकारांचे कपडे ओढणे असले प्रकार सुरू आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही आणि यासंदर्भात तुम्ही कारवाई करा अशी मागणी असलेले पत्र टीव्हीजेतर्फे मनोज जरांगे पाटील यांना दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही चार दिवस आणखी आहोत आम्हाला समजून घ्या अशा पद्धतीचे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले. मात्र कपडे ओढणे पॅन्ट खेचणे महिला पत्रकारांचा विनयभंग करणे हे खपवून घेतले जाणार नाही असे आपल्या पत्रकार महिला भगिनी यांनी त्यांना सांगितले आहे.
यापुढे असं वागणं सहन केलं जाणार नाही असं TVJA चे महासचिव पंकज दळवी आणि प्रणाली कापसे यांनी मनोज जरांगे यांना खडसावून सांगितलं.यावेळी TVJA चे महासचिव पंकज दळवी, TVJA कार्यकारिणी सदस्य राजू रेवणकर, प्रणाली कापसे, भाग्यश्री प्रधान, ब्रेना सोनी, रिध्देश हातिम, आदित्य जाधव, वैभव पाटील, जेष्ठ पत्रकार महेश पवार, मल्लिकार्जुन , प्रदीप कापसे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी मराठवाडा TV असोसिएशनचे माधव सावरगावे, विशाल करुळे, कृष्णा केंडे यांनी TVJA च्या मागणीला ठामपणे पाठिंबा दिला.
पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की, कपडे ओढणे, जबरदस्तीने बूम माईक ओढणे असे प्रकार सुरू आहेत. महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरून उभे रहातात. चुकीचे वक्तव्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे समजता ना..? मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता..? मुंबईतील मीडिया प्रतिनिधी दिवस-रात्र पावसात तुमचे आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत… अशावेळी गर्दीत तुमचे कार्यकर्ते सर्व पत्रकार आणि कॅमेरामनला त्रास देऊन अतिशय चूकीचे वागत आहेत. आम्ही टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशन च्या माध्यमातून तुम्हाला शेवटचा स्पष्ट इशारा देत आहोत. जर तुमच्या कार्यकर्त्यांनी मीडिया प्रतिनिधींना त्रास देणं थांबवले नाही तर मुंबईतील सर्व मीडिया तुमच्या आंदोलन वार्तांकनावर बहिष्कार टाकेल. तुमच्या कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले, तरच मुंबई मीडिया तुमचे वार्तांकन करेल असे स्पष्टपणे सांगितले आहे.ML/ML/MS