तुळजाभवानीच्या मंदिराकडून पूरग्रस्तांना एक कोटींची मदत

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेतातील पीक वाहून गेले, जनावरांचे हाल झाले, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि असंख्य कुटुंबे बेघर झाली. अशा संकटाच्या काळात श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराने हात पुढे करून हजारो पूरग्रस्तांच्या डोळ्यात दिलासा आणला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा निर्णय घेतला असून, तत्काळ ही रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीच्या काळात मंदिर संस्थानने 25 लाख रुपयांची मदत दिली होती.